शब्द मनातले - वडील
वडिलांशी खूप काही बोलावंसं वाटत पण नात असं आहे की आदरयुक्त भीती काल ही होती, आज ही आहे आणि पुढेही राहील. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेणं अवघड आहे पण काही गोष्टी अशा असतात की जास्त दिवस मनात ठेवणं अवघड होऊन जात, अशाच एक प्रसंगाची चर्चा तुमच्याशी करण्याची इच्छा मनी आहे.
तर झालं असं की, वडिलांना बर वाटत नव्हत म्हणून आई आणि वडील दोघे डॉक्टरांकडे गेले होते तर डॉक्टरांनी जिल्ह्याला जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला त्यामुळे वडिलांनी शंका नको मनात म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी एका प्रतीष्ठित हॉस्पिटल मधे उपचार घेण्यास सुरुवात केली, पहिल्या तपासणीनंतर लक्षात आलं की अँजिओप्लास्टी करावी लागेल, कारण तीन ब्लॉक्स हृदयामध्ये डिटेक्ट झाले होते, तात्काळ ऑपरेशनची गरज होती, तोपर्यंत मला काही त्रास होऊ नये म्हणून घरच्यांनी जाणीवपूर्वक माझ्यापासून ही गोष्ट लपवली होती.
दुपारी मयूरदादाचा कॉल आला, त्यावेळी मला कळलं की अस अस झालंय मला सांगण्यात आलं की फार काही सिरीयस नाहीय एक ब्लॉक आहे. त्यावेळी जरा भीती वाटली आणि लवकर वडिलांना भेटायची इच्छा झाली, रूमवर गेल्यानंतर काय परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी आईला कॉल केला जो की वडिलांनी उचलला, जसा काही वडिलांनी फोन उचलला अश्रू अनावर झाले, वडिलांशी कमी बोलण होत असल्याने आपल्याला जाणीवच नसते की वडिलांचं आपल्यावर आणि आपल वडिलांवर किती प्रेम आहे, वडिलांशी बोलव वाटत होत पण कंठातून आवाजच निघत नव्हता मी लवकरच फोन ठेवला आणि जे काही रडू आलंय आयुष्यात आजतागायत कधीही एवढं रडू कधी आलच नव्हत ज्यावेळी आपली जवळची व्यक्ती अशा परिस्थतीमध्ये असते आणि आपण जवळ नसलो की किती दुःख होत, हे त्यावेळी समजल. त्यानंतर वडिलांची सर्जरी यशस्वी रित्या झाली तेव्हा कुठे सुटकेचा निःश्वास सोडला त्यादिवशी खरं मनापासून देवाचे आभार मानले.
नंतर मी वडिलांना डिस्चार्ज देणार त्यादिवशी भेटायला गेलो मी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्याऐवजी त्यांना माझ्या कॉलेजच्या फीसची आणि माझ कसं चालुय मला पैसे पुरताय की नाही याची काळजी होती, त्यादिवशी येवढं नक्कीच लक्षात आलं की, येवढं निस्वार्थी प्रेम आयुष्यात कुणी करू शकेल का? नाहीच. ज्या माणसाला स्वतःच्या येवढ्या मोठ्या ऑपरेशन पेक्षा आपल्या मुलाची जास्त काळजी आहे, यापेक्षा मोठी पावती कुणाला पाहिजे असते, या प्रसंगानंतर त्यांच्याबद्दल असलेला आदर आणखीच वाढला. आणि मनाशीच ठरवलं की आपल्या आयुष्यात या माणसापेक्षा मोठ कुणी होऊच शकत नाही त्यामुळे त्यांची मान खाली जाईल असं काही कधीच आपल्या हातून घडू नये याची काळजी घ्यायची.
- चेतन जालिंदर गायकवाड
Comments
Post a Comment