आठवणी... खास क्षणांच्या....

          आयुष्य म्हटल की नवनवीन अनुभव येणारच, चढउतार येणारच, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आयुष्यात प्रवेश करणार, काही अल्पशा काळासाठी तर काही आयुष्यभर आठवणीत ठेवता येतील अशा आठवणी देऊन जाणारे, पण हाच तर खरा जीवनाचा आनंद आहे ना.
            आयुष्यातील अशाच एका अनुभवाविषयी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय...
            इंजिनिअरिंग...
            संजीवनी कॉलेजमध्ये डिप्लोमा केला अन् असे वाटले की खर आयुष्य तर जगलोय आपण, आता यापुढे असेच सर्व राहील ही अपेक्षा करण चुकीचंच...
            इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू केला जीवनसोबत, जीवन माझा खूप जवळचा मित्र, डिप्लोमा सोबत केल्याने दोघांनीही आत्मविश्वासाने डी. वाय. पाटील कॉलेज, आकुर्डीला प्रवेश घेतला. 
             पुण्याला एडमिशन घेणारे फक्त आम्ही दोघेच मित्र होतो असे नाही विवेक, अजय, हर्षदा, मयूर आणि यशराज हे माझे मित्र सोबतच असल्याने फार नवीन कुठे आलोय अशी भावना कधी मनात आलीच नाही, त्याचबरोबर पुनम, मोनाली आणि अभिजित हेही जॉब करत असल्यामुळे निगडीमधेच होते. पुण्याबद्दल खूप आधीपासून एक वेगळ्याच प्रकारचे आकर्षण असल्यामुळे आम्ही पुणे फिरतच राहिलो अगदीच मनाला आनंद देणारे हे क्षण होते ते. 
            मग जसे जसे काही दिवस गेले नवीन कॉलेज मधेही खूप चांगले मित्र भेटले, सर्वांत अगोदर भेटला तो गौरव शिंदे, अगदीच आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन घेऊन आलेला, कुठल्याही गोष्टीचा फार कधी टेन्शन न घेणारा आणि मनसोक्त आयुष्य जगणारा... त्यानंतर ओळख झाली ती किर्तिकुमार उर्फ केके आणि रजतशी. प्रत्येकाची एक वेगळीच खासियत होती किर्तिकुमारची इंग्रजी खूप छान होती तर रजातभाऊ म्हणजे काहीही अडचण असो जुगाड करण्यात तज्ञ मनुष्य... पहिल्या दोन महिन्यातच आम्हा पाच जणांची चांगलीच गट्टी जमली कुठेही गेले तरी सोबतच मग ते लेक्चर बंक करण असो वा कुठे फिरायला जाणं असो.
             इंजिनिअरिंग हे खरंच एक चांगल्या माणसांचा खजिना आहे हे जाणवायला लागलं कारण आयुष्यात अशी माणसे भेटत होती की बस.. सुजित, सुजित बद्दल काय बोलावं प्रत्येक गोष्टीत नेहमीच अव्वल अभ्यासात म्हणा की खेळात. अनिकेत भाऊ म्हणजे तर पोरांसाठी बँकच होती. पवन, आपला पवण्या हो, परीक्षेच्या अगदी ब्लॉकसमोर उभे राहिपर्यंत पुस्तक वाचणारा... मितेश आणि हरीश भाऊ हे खरे टॉपर माणसं सबमिशन म्हणा किंवा पेपरचा सखोल अभ्यास सर्व काही हेच सर्वांना पुरवणार...सागर भाऊ आणि निखिल शेठ म्हणजे तर आम्ही कितीही मजा घेतली तरी हसून सहन करणारे असा आमचा एक चांगला ग्रुप तयार झाला मग काय वर्गात म्हणू नका की कॉलेज मधे फिरणं अगदीच मजेत...
            ओंकरच्या घरी जाणं म्हणजे तर एक पर्वणीच होती, नेहमीच मदतीला तत्पर असणारा हा मित्र.. याचसोबत मिळाल्या खूप साऱ्या मैत्रिणी... मैत्रिणी नव्हे बहिणीच संचयती, ऋतुजा , कोमल... अगदीच दिलखुलास मैत्री असल्यामुळे कधी घरची आठवण फारशी होत नसे....
            कॉलेजचे दिवस खरच खूपच आनंददायी होते, लेक्चर ला बसून गप्पा मारणं म्हणू नका की मित्रांसोबत कॅन्टीनला तासनतास बसणं म्हणू नका सगळचं स्वप्नवत होत.. पण आम्ही लोक जेवढी मजा करत होतो तेवढाच अभ्यासही जिद्दीने करत होतो त्यामुळे घरून आम्हाला अभ्यासासाठी सूचना कधी आल्या नाही, मग ते रूमवर ग्रुप स्टडी असो किंवा लायब्ररीमधे सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास करणं सगळ्या प्रकारचा अनुभव या काही दिवसांमध्ये आला.
              असच एक दिवस आठवतो, फायनल परीक्षा सुरू होत्या नेहमी प्रमाणे अभ्यासही सुरू होता, रात्रभर जागून अभ्यास करूयात अस आम्हा चौघांच (जीवन, विवेक, केके, मी) ठरल.आम्ही चौघे 10 वाजता जेवण करून कॉलेजला गेलो सकाळचे नव्हे रात्रीचे बर का.. आता आमच्या कॉलेजचा एक नियम होता की 11 नंतर गेट बंद व्हायचं ते पहाटे 5 वाजता उघडायचं, तरी आम्ही गेलो खर पण रात्री 1 नंतर कुणाचाच अभ्यास होईना झाला प्रत्येकाला झोप यायला लागली मग आमचं ठरल की security ला रिक्वेस्ट करून बाहेर पडायचं, ठरल्याप्रमाणे आम्ही गेट वर गेलो पण त्यांनी आम्हाला हाकलून दिलं पुन्हा रिडिंग हॉल मधे, रूमवर तर जायचं होत एक अनोळखी मुलगा भेटला त्याने विचारलं की तुम्हाला बाहेर पडायचं आहे का आम्ही आपसून हो बोललो मग तो म्हंटला की चला माझ्या मागे.. आम्ही त्याच्या पाठोपाठ कॉलेजच्या मागच्या बाजूला गेलो तो भिंतीवर चढला त्याने प्रत्येकाला हात देऊ वर खेचलं तो बाहेर पडला आणि आम्हीही...
             इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला गेल्यानंतर आम्ही फ्लॅट वर राहण्याचा निर्णय घेतला आणि तो सर्वात चांगला निर्णय होता असा वाटल. कारण तिथे गेल्यावर रुपम आणि रेवणनाथ या दोन जुन्या दोस्तांशी ओळख आणखी घट्ट झाली, रुपमसोबत अभ्यास करायची मजा काही वेगळीच होती कारण आम्ही अभ्यास कमी न गप्पाच खूप मारायचो😅
             फ्लॅटच वातावरण इतकं सुंदर होत की घरीच असल्याची जाणीव क्षणोक्षणी होत असे, मग आम्ही कुठले सण म्हणू नका की उत्सव अगदीच घरच्यासारखे साजरे केले.. विशेषतः गणेशोत्सव, फ्लॅटवर गणपती बसवला अन अचानक फ्लॅटवर वर्दळ वाढली, लोकमान्य टिळकांनी याच कारणासाठी गणेशोत्सव सुरू केलंय याची खात्री पटली, गणपतीचे दहा दिवस इतके आनंददायक पद्धतीने साजरे झाले की ज्याची अपेक्षा ही कधी केली नव्हती. 
            हळूहळू अपार्टमेंट मध्ये ही ओळखी वाढत गेल्या मयुरीताई, दिव्या, भाग्यश्री, सिद्धी सर्वांशी ओळखी झाल्या... कोजागिरी पौर्णिमेला खेळलेल्या दमशराजचे अजूनही विस्मरण होत नाही...
             कधी कधी ते दिवस आठवले की हसू येत कारण तेव्हा मी एक शीट बनवलं होत त्यामधे कुणी कोणतं काम कधी करायचं याची नोंद होती अन् तस न करणाऱ्याला दंडस्वरून पैसे भरावे लागत असत कदाचित त्यावेळी माझ्या रूममेट्सना हिटलरची आठवण येत असावी... मनात भीती इतकी होती की, केके त्याच्या पांघरूनाची घडी घालायला जमत नसेल तर ते उशीखाली लपवून जायचा...😂
              आयुष्यातले सर्वोत्तम दिवस जगत असतानाच कोरोनाची आयुष्यात एन्ट्री झाली अन् सगळचं बदललं पुढचे दीड वर्ष घरूनच झाल्याने ना आठवणी तयार झाल्या ना रमणीय क्षण... मार्क्स खूप पडत गेले पण तेव्हा मार्क्सपेक्षा जास्त मित्रमैत्रिणींची गरज होती. 
              असो अशा पद्धतीने इंजिनिअरिंगचे दिवस जगण्यात आले, खूप कमी होते दिवस पण आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा आठवणी आणि अनुभव देऊन गेले...
              (काही आठवणींतली छायाचित्रे)
                                - चेतन जालिंदर गायकवाड 

Comments

Popular posts from this blog

शब्द मनातले - वडील