तू असशील ना....
मी आणि मीपणाची शर्यत अखेर शेवटची लढत लढेल, मीपणाचा दारुण पराभव होईल, स्वतःचा तिटकारा निर्माण होईल, अशावेळी जवळची माणसे ही तोंड फिरवतील, अगदी हृदयाजवळची ही, जगावं की मरावं हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तू असशील ना.... जेव्हा जगाला विसरायची इच्छा होईल, मन आपल्या माणसाचा वेध घेईल , प्रेमाचे चार शब्द ऐकण्यासाठी हृदय आतुर होईल, सोसाट्याचा वारा ही मनाला हलवू शकणार नाही जे तुझा एक हळुवार स्पर्श सहज करू शकेल अशावेळी तू असशील ना... कधीतरी हे एकाकीपण सोसावणार नाही, एकटं मन खायला उठेल, आठवत राहतील सोबत घालवलेले क्षण, सर्व चुकांची जाणीव होईल, याच चुकांची जेव्हा ग्वाही देण्याची संधी निर्माण होईल, अशावेळी तू असशील ना... कुणासमोर तरी व्यक्त व्हायचंय पण कुणी ऐकणार सापडणार नाही, मनातल सर्व बोलून टाकावसं वाटेल, पण कुणाकडे वेळच राहणार नाही, अशाच एखाद्या रात्री तुझा हात हातात घेऊन भविष्याची स्वप्न पाहायची इच्छा होईल, तेव्हा तू असशील ना... तुझ असणं आणि तुझ नसणं यात किती फरक आहे हे तुला मी काय ग वेगळ सांगणार ना, माझ आयुष्य जर पुस्तक असेल...