स्वप्नांची गोष्ट सांगता यावी....
गर्द रानात सांडलेली काजवे वेचायला चांदण्याची घाई व्हावी,
जणू मुरमुर्याचे पोते सुटून डोंगरावरूनी भुरभुरत खाली यावी
जगणं ही खोट वाटाव इतकी स्वप्न खरी व्हावीत,
आणि जगणं जगून झाल्यावर मरणाआधी जाग यावी
समुद्राच्या निळाशार डोहामधे शुभ्रकोरी पाने सापडावीत,
अणकुचीदार शंखातून सप्तरंगी शाई यावी
जीवन अगदीच शुभ्र सुंदर असलं,
तरी कधी वाटतं काळोखाशीही मैत्री व्हावी
बुडबुड्यासारखे आपल्याच पाण्यात विरघळणारे शब्द यावेत,
त्यातील काही मोती व्हावेत तर काही ढगांसोबती उडून जावेत
सांजेला क्षितिजावर सुरांची बेधुंद मैफिल जमावी,
कागदी फुलांसारखी मनाची आरपार जाळी निर्माण व्हावी
हे आणि असं बरच काही व्यक्त व्हायला तरी,
स्वप्नांची गोष्ट सांगता यावी....
Comments
Post a Comment